Breaking News

ओबीसी व व्हिजेएनटी समाजातील दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाज्योती करणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

ओबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के स्कॉलरशीप मिळवून देण्याची ग्वाही

विद्यार्थ्याना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅबचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 19 नोव्हेंबर: टीआरटीआईच्या माध्यमातून एसटी, बार्टीच्या माध्यमातून एस.सी व सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येते. आता, ओबीसी व व्हिजेएनटी समाजाच्या मुलांना प्रशिक्षणासाठी व त्यांच्या उत्थानासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ओबीसी व व्हिजेएनटी समाजातील दुर्लक्षित व शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महाज्योती करणार आहे, असे प्रतिपादन महाज्योतीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे आयोजित महाज्योतीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डेटा सीम वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, मुख्य लेखाधिकारी अतुल वासनिक, लिनोवो कंपनीचे मॅनेजर निलेश सातफळे प्रामुख्याने उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना समाजात प्रतिष्ठा आणि सन्मानाची वागणूक मिळत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पुणेसारख्या शहरात शिक्षणाच्या व प्रशिक्षणाच्या संपूर्ण सोयी आहेत. मात्र तेवढा खर्च ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी करू शकत नाही. आज महाज्योतीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम महाज्योती करीत आहे. सामान्य कुटुंबातील तसेच इतर विद्यार्थ्यांना याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासोबतच विद्यार्थ्याना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी 2022 पर्यंत 6 जीबी डेटा मोफत देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पालकमंत्री पुढे म्हणाले, महाज्योतीची स्थापना बहुजनांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी करण्यात आली आहे. आज महाज्योतीच्या माध्यमातून यूपीएससी परीक्षेसाठी 1 हजार तर एमपीएससी परीक्षेसाठी 2 हजार विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. पीएचडी करणाऱ्या 800 विद्यार्थ्यांना कमाल 5 वर्षासाठी विद्यावेतन देण्यात येणार आहे. जेईई व नीटच्या 3 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षणाचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहे. ओबीसी प्रवर्गाला फक्त महाराष्ट्रातच स्कॉलरशिप देण्यात येते. त्यामुळे एससी, एसटीच्या धर्तीवर ओबीसीच्या मुलांना 100 टक्के स्कॉलरशिप देण्यात येईल. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सिपेट या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून 10 हजार मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन नोकरी उपलब्धक करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार श्री. धानोरकर म्हणाले, ओबीसी व व्हिजेएनटी समाजाला न्याय देण्यासाठी महाज्योतीची निर्मिती सन 2019 मध्ये करण्यात आली. समाजात मागे पडलेल्या घटकांना मदतीचा हात देऊन त्यांची सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक व सांस्कृतिक उन्नती करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी महाज्योतीचे प्रयत्न सुरू आहेत. एमपीएससी, यूपीएससी,नीटच्या माध्यमातून भविष्यात महाज्योतीच्या माध्यमातून अधिकारी घडवून आणता येईल. तसेच या ऑनलाईन प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होईल व शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घरी बसून सुद्धा विद्यार्थ्यांना घेता येऊ शकेल. असेही ते म्हणाले.

महाज्योती या संस्थेच्या निर्मितीचे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात येते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाज्योतीचे पुणे येथील कार्यालय नागपूर या ठिकाणी आणले. महाज्योती ही एक स्वायत्त संस्था असून बहुजनांच्या संपूर्ण कल्याणासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाज्योतीच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे म्हणाले.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, सध्या डिजिटल युगात आपण वावरत आहोत, सर्व जग आता डिजिटल झाले आहे. त्यामुळे डिजिटल शिक्षण घेण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महाज्योतीमार्फत विनामूल्य टॅबचे वाटप करण्यात येत आहे. करिअरच्या उंबरठ्यावर आपण उभे असून पुढे काय करावे, ही ध्येय निश्चिती आत्तापासूनच करावी. प्राप्त उपलब्ध ससांधनाचा वापर करून ध्येय प्राप्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. यावेळी जि.प.अध्यक्षा यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.

यावेळी महाज्योतीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डेटा सीमचे वाटप पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये स्नेहा विकास कोरे, शर्वरी नरेंद्र करकडे, उन्मयी कावडकर, पल्लवी उरकुडे, रोहिणी खेवले, आरुष पालपनकर, सुमित गुरनुले,प्रांजली करकडे, श्रेयस मांडवकर, भाग्यश्री कुनघाडकर तर जान्हवी लेनगुरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचलन हेमंत शेंडे तर आभार कुणाल सिरसाठ यांनी मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved