Breaking News

माजी महापौर सरदार अटल बहादूर सिंग यांचे निधन

क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील अजातशत्रू हरपला

प्रतिनिधी नागपूर

नागपूर, – दिनांक १९ नागपूर शहराचे दोनदा महापौरपद भूषविलेले क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील समर्पित व्यक्तिमत्त्व सरदार अटल बहादूर सिंग यांचे शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) निधन झाले. ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्यावर सदर येथील शांतीभवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने नागपूर शहरातील क्रीडा, साहित्य, सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

१४ फेब्रुवारी१९७७ साली पहिल्यांदा त्यांनी नागपूर शहराचे महापौरपद भूषविले. १४ फेब्रुवारी१९७७ ते ६ फेब्रुवारी १९७८ पर्यंत महापौर पदाचा पहिला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये पुन्हा एकदा शहराचे नेतृत्व केले. ३ फेब्रुवारी १९९४ ते १९ जानेवारी १९९५ साली सरदार अटल बहादूर सिंग यांनी दुसऱ्यांदा महापौरपद भूषविले. यापूर्वी १९७४ साली ते उपमहापौर राहिले होते. सरदार अटल बहादूर सिंग यांनी लोकमंच गट तयार केला. या गटाद्वारे ते अपक्ष म्हणून मनपामध्ये निवडून यायचे. त्यांनी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता.

त्याकाळी नागपूर महानगरपालिकेचे चार प्रमुख स्तंभ मानले जायचे. सरदार अटल बहादूर सिंग, नाना श्यामकुळे, हिंमतराव सरायकर आणि प्रभाकरराव दटके यांनी नागपूर महानगरपालिकेला दिशा देण्याचे मोलाचे कार्य केले. वेळेचे नेहमी पालन करणारे व्यक्ती म्हणूनही सरदार अटल बहादूर सिंग यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वच मोठ्या नेत्यांशी त्यांचे सौख्य होते. नागपूर विद्यापीठाच्या राजकारणातही त्यांचा दबदबा होता. शहराचे पहिले महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची कन्या कुंदाताई विजयकर यांना शहराची पहिली महिला महापौर बनविण्यात सरदार अटल बहादूर सिंग यांचे मोठे योगदान मानले जाते.
त्यांनी गरीब मनपा विद्यार्थ्यांसाठी शेषराव वानखेडे विद्यानिकेतन सुरु केले. नागपूर शहरात मनपाचे वाचनालय सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला व स्वतःच्या कार्यकाळात अनेक वाचनालय त्यांनी सुरू केले. २०१४ साली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

*सरकारने पाठ फिरवली तेव्हा उभा राहिलेला ‘सरदार’*

सरदार अटल बहादूर सिंग यांनी १९९४ ला दुसऱ्यांदा महापौरपद ग्रहण केले. त्याच वर्षी नागपूर शहराला मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला होता. नागपूर शहरात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यात १० ते १२ लोकांचा मृत्यू सुद्धा झाला. या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून मदत न मिळाल्यामुळे शहराचा खरा ‘सरदार’ म्हणून अटल बहादूर सिंग यांनी कर्तव्य बजावले. त्यांनी महापौर फंड तयार करून त्यात नागपूर शहरातील सेवाभावी नागरिकांकडून निधी गोळा करून तो मृतांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दिला होता.

*मनपाचे छत्र हरपले : महापौर दयाशंकर तिवारी*

नागपूर नगरीचे माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने नागपूर महानगरपालिकेचे एक छत्र हरपले. सरदार अटल बहादूर सिंग यांना सर्वकालिक महापौर म्हणून सुद्धा ओळखले जात होते. तीस वर्ष ते नागपूर महानगरपालिकेत होते दोनदा महापौर आणि एकदा उपमहापौरपद त्यांनी भूषवले. विद्यापीठाच्या राजकारणात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. क्रीडा, साहित्य आणि सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर होते. त्यांच्या जाण्याचे दुःख नागपूरकरांसोबतच मला सुद्धा आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचे योगदान नागपूर शहर कधी विसरणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

*अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी अटलबहादूर सिंग : संक्षिप्त परिचय*

जन्म २ मार्च १९४२, वडील इक्बाल सिंग, आई उषा रानी शिक्षण एम ए राज्यशास्त्र, जन्म बनारस. जवळजवळ तीस वर्ष नगरसेवक दोनदा महापौर १९७७ व १९९४ तसेच १९७४ मध्ये उपमहापौर मनपा रौप्यमहोत्सवी वर्षात महापौरपद.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती जीवनगौरव २०१४, विदर्भ महिला क्रिकेट, विदर्भ महाराष्ट्र हँडबॉल, विदर्भ हॉकी, विदर्भ फुटबॉल, नागपूर फुटबॉल, संघटनेचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी. क्रीडापटूवर पुरस्कारांचा वर्षाव करणारे ज्येष्ठ क्रीडा संघटक व मार्गदर्शक.

विद्यापीठाच्या राजकारणात प्रचंड दबदबा. बलराज अहेर यांना गुरु मानणारा. प्राचार्य हरिभाऊ केदार स्थायी समिती अध्यक्ष व अटलबहादूर महापौर पदावर असताना संपूर्ण नागपुरात राम-लक्ष्मण जोडी म्हणून लोकप्रिय.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved