Breaking News

शेततळे…मत्स्यव्यवसाय….सिंचन…बांधावर फळबाग लागवड

‘धानातून धनाकडे’ : युवा शेतक-याचा अभिनव उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 9 : शासकीय योजनेचा लाभ घेऊन स्वत:च्या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून पारंपरिक शेतीचा कायापालट करू शकतो हे सिध्द केले आहे, पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथील युवा शेतक-याने. विशेष म्हणजे शासकीय योजनेतून मिळालेल्या शेततळ्यात स्व:खर्चाने मत्स्यबीज सोडून मत्स्य उत्पादन, त्याची विक्री, या शेततळ्यातून शेतीला सिंचन आणि शेततळ्याच्याच बांधावर फळबाग लागवड असा उपक्रम या तरुणाने राबविला आहे. एक प्रकारे धान या पारंपरिक उत्पादनाला फाटा देऊन तो धनाकडे वळला आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी (तुकूम) येथील रहिवासी असलेल्या प्रवीण बुधाजी सोमनकर (वय 29) या तरुणाची चेक हत्तीबोडी येथे साडेसात एकर शेती आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या प्रवीणला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) भरतीने हुलकावणी दिली. त्यानंतर तो थेट शेतीकडे वळला. कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत 25 बाय 20 बाय 3 मीटर शेततळ्यासाठी 2017 मध्ये त्याला 50 हजार रुपयांचे अनुदान मिळाले.

यातून शेततळे पूर्ण करून त्यात प्रवीणने स्व:खर्चाने मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेतला. यात ग्रासकर्प, सिरपन, रोहू, कटला या मास्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. दरवर्षी जुलैमध्ये शेततळ्यात मत्स्य बीज सोडले जाते. अर्धा ते पाऊण किलोचे मासे झाले की प्रवीण त्याची विक्री करतो. मागच्याच महिन्यात त्याने 50 हजार रुपयांची मासेविक्री केली. शेततळ्यात सद्यस्थितीत पाण्याची पातळी चांगली आहे. मात्र पाणी कमी झाले तर मास्यांना जगविण्यासाठी शेतातील बोअरचे पाणी शेततळ्यात सोडतो, असे त्याने सांगितले.

शेततळे आणि मत्स्यव्यवसाय एवढ्यावर न थांबता प्रवीणने महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून शेततळ्याच्या बांधावर आणि शेतात फळबाग लागवड केली आहे. त्यासाठी त्याला कृषी विभागाकडून अनुदान प्राप्त झाले असून आजघडीला त्याच्या शेतात आंब्याची दशहरी, लंगडा, हापूस, केशर या प्रजातींची 60 झाडे, पेरू, सिताफळ आणि फणसची प्रत्येकी 10 झाडे आहेत. एवढेच नाही तर शेततळ्याच्या एका बाजुला त्याने निलगीरीसुध्दा स्व:खर्चाने लावली आहे. कृषी विभागाने शेतात सिंचनाकरीता प्रवीणला महाडीबीटी योजनेंतर्गत पाणबुडी मोटर आणि पाईप 20 हजार रुपयांच्या अनुदानावर उपलब्ध करून दिले आहे. शेततळे आणि बोअरच्या माध्यमातून शेतात सिंचन होत असल्यामुळे धानासोबतच, भाजीपाला आदी पिके तो घेत आहे. गतवर्षी प्रवीणला 2 लाखांचे उत्पन्न झाले. फळबाग उत्पनातून प्रत्यक्ष आंबे निघाल्यावर त्याचे उत्पन्न नक्कीच दुप्पट होईल, असेही प्रवीण सोमनकर याने सांगितले.

पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेततळे, मत्स्यउत्पादन, फळबाग लागवड आणि सिंचनातून ख-या अर्थाने प्रवीणने समृध्दी साधली असून तो ‘धानातून धनाकडे’ वळल्याचे चित्र आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved