
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी (प्र.):-वाडी पोलीस स्टेशन हदित नवनीत नगर येथील एका घराच्या खोलीत महिलेचा शुक्रवारी सकाळी रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवनीत नगर येथे राहणारे बालपांडे यांचा घरी मागील ६ महिन्यापासून सरोदे दाम्पत्य भाड्याने राहते.पती मनोज ज्ञानेश्वर सरोदे वय-४८ वर्ष, हा एमआयडीसी येथील केबल कंपनीत वाहन चालकाचे काम करायचा तर मयत पत्नी माधुरी मनोज सरोदे वय-४२, ही सुद्धा एमआयडीसीतील सिंपलेक्स कंपनीत कामाला जायची. सरोदे दांपत्याला मुलगा प्रेम वय-१२ वर्ष व मुलगी मोनिका वय-१७ वर्ष अशी दोन मुलं आहेत. पती-पत्नी वर्धा येथे वास्तव्यास असताना व मनोजला दारूचे व्यसन असल्यामुळे कच्चा कागदावर त्यांचा घटस्फोटही झाला परंतु नातेवाईकांनी समजूत घालून पुन्हा त्यांना एकत्र केले होते.
परंतु यानंतरही दोघांमध्ये सतत वाद-विवाद व्हायचा याच कारणाने नवनीत नगर येथील नातेवाईकांनी डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी त्यांना वर्धे वरून येथे बोलावले होते. नवनीत नगर येथे आल्यावर काही दिवस मनोज ने दारू बंद केली होती मात्र मागील ३ महिन्यापासून तो सतत दारूच्या आहारी गेला होता.गुरुवारी हनुमान जयंती असल्याने जवळच्या मंदिरात महाप्रसादाचे वितरण होते माधुरी महाप्रसाद घेऊन तिची नवनीत नगर स्थित मोठी बहीण गणोरकर हिच्याकडे रात्री ११ चे दरम्यान गेली व मुलाला तिथेच सोडून ती आपल्या खोलीवर आली.गुरुवारी रात्री अज्ञात कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले असावे व दारूच्या नशेत असलेल्या मनोज ने मयत पत्नीच्या डोक्यात, तोंडावर व पोटावर चाकूने सपासप वार करून खून केला असल्याचे समजते.
शुक्रवारी सकाळी मुलगा मावशी गणोरकर च्या घरून जेव्हा घरी परतला तेव्हा त्याला त्याच्या आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मुलगा घाबरला आणि रडायला लागला. शेजाऱ्यांनी घटनास्थळी येऊन महिला मृतावस्थेत असल्याचे पाहिले. जागरूक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.लागलीच पोलीस उपायुक्त अनुराग जैन,सहायक पोलिस आयुक्त प्रवीण तेजाडे, वाडीचे पो.नि.प्रदीप रायण्णावर,एपीआय अचल कपूर,पीएसआय विजेंद्र नाचन,गणेश मुंडे यांच्यासह अन्य पोलीस घटनास्थळी पोहोचले.
घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.हत्येचे चे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस शिपाई प्रमोद गिरी, प्रवीण फलके,प्रमोद यांनी आरोपी पतीचा आर्वी वर्धा येथे शोध घेतला व त्याला ताब्यात घेतले.पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत.