
नागपूर, ता. २३ : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये महत्वाची चार लक्षणे दिसून आढळल्यास आता क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे आढळणा-या कोरोनाबाधित रुग्णांची एक्स रे आणि सीबीनॅट द्वारे तपासणी करून क्षयरोग निदान करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार व शहर क्षयरोग अधिकारी डॉ.शिल्पा जिचकार यांनी दिली.
विशेष म्हणजे, सर्व क्षयरुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. क्षयरोग कोरोना द्विदिशात्मक तपासणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण विभागाकडून दिल्या आहेत. सारी अथवा आयएलआय रुग्णांचीही क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सारी व आयएलआय च्या २२१ रुग्णांमधून ११ क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. तीव्र श्वसन संक्रमण आजार सारी व इन्प्लुएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांची तपासणी एक्स रे व सीबीनॅट द्वारे क्षयरोगाचे निदान करण्यात येणार आहे.
मेडिकल, मेयो व सदर रुग्णालयात सुविधा वेगवेळ्या अभ्यासात कोव्हिड-१९ च्या रुग्णात क्षयरोगाचे प्रमाण ०.३७-४.४७ टक्के असल्याचे आढळून आले आहे.क्षयरोग असलेल्या व्यक्तींमध्ये २.१ पट गंभीर कोव्हिडचा धोका असतो. यास्तव क्षयरोग व कोव्हिड या दोन्ही समस्यांचे निराकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि सदर रोग निदान व अनुसंधान केंद्र येथे वैद्यकिय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात क्षयरोग तपासणीसाठी बाह्यरूग्ण तपासणी सेवा व निदानासाठी सीबीनॅट सुविधा सुरू आहे. याचा लाभ रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बहिरवार आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी केले आहे.