Breaking News

मनपातर्फे यंदा ५८२ फटाका दुकानांना परवानगी

कोव्हिड संदर्भातील नियमांसह अग्नीसुरक्षा नियमांचेही पालन करणे अनिवार्य

नागपूर, ता. ४ : येत्या दिवाळीच्या तयारी संदर्भात संपूर्ण शहरात तयारीला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात संपूर्ण सुरक्षेची काळजी घेउन मनपातर्फे शहरातील व्यवसायांना परवानगी देण्यात येत आहे. दिवाळीमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या फटाक्यांसंदर्भात विस्फोटक अधिनियमांन्वये नागपूर महानगरपालिकेतर्फे दुकानांना परवानगी देण्यात येते. यावर्षी मनपाच्या ९ अग्निशमन स्थानकांतर्गत ५८२ फटाका दुकानांना अग्निशमन विभागातर्फे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

मनपातर्फे दरवर्षी फटाका व्यावसायिकांना अस्थायी व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. तसेच अंतीम परवानगी/लायसन्स पोलिस विभागातर्फे देण्यात येते. मनपाच्या अग्निशमन विभागाव्दारे रु. १००० शुल्क आकारण्यात येते तसेच पर्यावरण शुल्क रु. ३००० आकारण्यात येत आहे. मागच्या सहा वर्षात अग्निशमन विभागाने दिलेल्या परवानगी या प्रकारे आहे – वर्ष २०१४ मध्ये ८८९, वर्ष २०१५ मध्ये ९५१, वर्ष २०१६ मध्ये ९८२, वर्ष २०१७ मध्ये ८६५, वर्ष २०१८ मध्ये ७७७, वर्ष २०१९ मध्ये ७५२ आणि यावर्षी २०२० मध्ये ५८२ फटाका दुकानांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आली आहे.

यावर्षी मनपाच्या सिव्हिल लाईन्स अग्निशमन स्थानकांतर्गत ६७, गंजीपेठ अग्निशमन स्थानकांतर्गत ३५, सक्करदरा अग्निशमन स्थानकांतर्गत ११४, कळमना अग्निशमन स्थानकांतर्गत ३८, लकडगंज अग्निशमन स्थानकांतर्गत ४५, सुगतनगर अग्निशमन स्थानकांतर्गत ९३, नरेंद्रनगर अग्निशमन स्थानकांतर्गत ६९, कॉटन मार्केट अग्निशमन स्थानकांतर्गत ३७, त्रिमूर्तीनगर अग्निशमन स्थानकांतर्गत ८४ असे एकूण संपूर्ण शहरातील ५८२ व्यावसायीकांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त मनपाचे मालमत्ता कर भरलेल्या दूकानांना सुध्दा तात्पुरती परवानगी दिली आहे. मनपाला याच्यातुन रु. २३ लक्ष २४ हजार चे उत्पन्न यावर्षी प्राप्त झाले आहे.
फटाका दुकानांच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करणा-या अर्जदाराला उपरोक्त स्थळी १५ दिवसांकरिता ४५० किलोग्रॅम पर्यंतचे फटाका विक्रीसाठी परवानगी दिली आहे. यासाठी अग्निशमन विभागाद्वारे सूचविण्यात आलेल्या उपाययोजनांचे व कोव्हीड – १९ संबंधी शासनाचे दिशा-निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे. नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त सर्व दुकानांना निर्धारित जागांमध्येच व्यवसाय करणे अनिवार्य आहे.

या ठिकाणी व्यवयासाला प्रतिबंध

सीताबर्डी मेन रोड, महाल चौक ते गांधीगेट चौक, महाल चौक ते भोसला वाडा, महाल चौक ते बडकस चौक, कल्याणेश्वर मंदिर परिसर, गोळीबार चौक ते टिमकी, तीननल चौक ते शहीद चौक, शहीद चौक ते टांगा स्टँड, हंसापुरी ते नालसाब चौक, मस्कासाथ चौक ते नेहरू पुतळा, मारवाडी चौक, मेयो रुग्णालय परिसर, डागा रुग्णालय, मेडिकल कॉलेज परिसर, इंदोरा चौक ते कमाल टॉकीज चौक, गोकुळपेठ बाजार, सदर रेसिडेन्सी रोड तसेच गर्दीच्या व गजबजलेल्या मार्गांवर फटाका दुकाने लावता येणार नाही, याचे प्रत्येक फटाका व्यावसायीकाने पालन करावे, असे आवाहनही मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी केले आहे.

या उपाययोजना करणे अनिवार्य

दुकानामध्ये गर्दी होउ नये याची काळजी घेणे, दुकानदारासह ग्राहकांनीही मास्क लावणे अनिवार्य, दुकानात प्रवेशापूर्वी सॅनिटाजरची व्यवस्था असावी, दुकानांचे बांधकाम ज्वलनशील नसावे, दुकानात विद्युत तारा उघड्यावर व लटकलेल्या नसाव्यात, तारा कंड्यूट पद्धतीचे असावे व ईएलसीबी व्यवस्था असावी, विद्युत उपकरणाच्या तारा लगत फटकांच्या साठवणूक नसावी, फटाका ज्वालाग्राही आगीस कारणीभूत वस्ती जवळ ठेवू नये, फटाक्यांची मांडणी किंवा साठा दुर्घटना होउ नये यादृष्टीने ठेवावी, दुर्घटना घडल्यास पळण्यास सुरक्षित मार्ग उपलब्ध असावा, १०० चौरस फुट घनक्षेत्रफळापर्यंतच्या दुकानाकरिता कमीत कमी २नग डी.सी.पी., ए.बी.सी. ४ किलोग्रॅम क्षमतेचे ठेवण्यात यावे व २०० लीटर पाण्याचा १ ड्रम ठेवण्यात यावा, दुकानासमोर फटाके फोडू नये वा परवानगी देउ नये, बेसमेंट किंवा जिन्यालगत फटाक्याचा साठा करू नये, फटाका विक्री व्यतिरिक्त अन्य कोणताही व्यवसाय सदर ठिकाणी करू नये, फटाक्यांची मांडणी दुकानाबाहेर नसावी, खुले फटाके ठेवू नये, धुम्रपान निषेधाचे सुचनाफलक लावावे, दुकानाच्या आजुबाजुच्या रहिवासी मालमत्ता धारकांची फटाका दुकानास हरकत नसावी, व्यवसायाकरिता पोलिस विभागाची परवानगी आवश्यक, उपरोक्त उपाययोजनांच्या अपर्याप्ततेमुळे कोणतिही दुर्घटना घडल्यास संबंधीत मालक, अर्जदार स्वत: जबाबदार राहिल.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन

नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर …

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved