नागपूर दि 24 : भारत निवडणूक आयोगाने 23 तारखेच्या आदेशानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे.आता 320 केंद्रावर मतदान होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नागपूर विभाग नागपूर पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची अंतिम यादी जाहीर करताना मतदारांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे.
कोवीड -१९ संदर्भातील सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे.
नव्या यादीनुसार आता नागपूर जिल्ह्यामध्ये 162, भंडारा जिल्ह्यांमध्ये 31, गोंदिया जिल्ह्यामध्ये 21, वर्धा जिल्ह्यामध्ये 35, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 50, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 21 असे एकूण 320 मतदान केंद्र असतील.