
नागरिकांनी सतर्क रहावे – डिफेन्स प्रशासन, कॅमेरे बसविले, शोध सुरूच – वनविभाग
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र)
नागपूर ग्रामीण आयुध निर्माणी अंबाझरी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने रहिवासी व प्रशासनात चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना परिपत्रक जारी केले आहे.
आयुध प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार, हा बिबट्या गुरुवारी कारखान्याच्या प्रवेशद्वार क्रमांक २ समोरील रस्त्यावरून जाताना दिसला.
सूचना मिळताच संरक्षण कार्यालय व डीएससीच्या संरक्षण यंत्रणेने बिबट्याचा शोध सुरू केला.मात्र तो अध्याप आढळुन आला नाही. परिस्थिती पाहता आयुध प्रशासनाने याबाबत हिंगणा वनविभागाला माहिती दिली आहे. आयुध निर्माणी प्रशासनाने डिफेन्स परिसरातील रहिवाशांना,कर्मचाऱ्यांना सतर्क करीत आवाहन केले आहे की त्यांनी एकट्याने बाहेर फिरू नका,हा प्राणी दिसल्यावर हलू नका, आक्रमकपणे वागू नका , किंवा हा प्राणी हल्ला करेल, अशी कोणतीही परिस्थिती निर्माण करू नका.
गेल्या काही महिन्यांपूर्वी ही या परिसरात ३ दिवस बिबट्याचा वावर असल्याची माहिती आहे.त्या वेळी अंबाझरी वनविभागाने सतत कृतीशील राहून, कॅमेरे बसवून बिबट्याचा शोध लावला होता. परंतु त्याला पकडू शकले नव्हते. शेवटी कमलानगर वाडीच्या बाजूने त्याने अंबाझरी वन उद्यानात प्रवेश केल्याची माहिती मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या संदर्भात हिंगणा-अंबाझरी वनपरिक्षेत्र अधिकारी-निनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती योग्य असल्याचे सांगितले.बिबट्याची उपस्थिती लक्षात घेता यु.बी. भामकर, क्षेत्र सहाय्यक ,हिंगणा यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचाऱ्यांचे पथक शोधकार्यात गुंतले आहे.तसेच 5 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परिसरात रात्रीच्या वेळेसाठी पेट्रोलिंग करिता विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.*