Breaking News

खड्ड्यांभोवती दिवे व फुलझड्या लावून नागपुरकरांनी नोंदवला महापालिकेचा निषेध

नागपूर सिटिझन्स फोरमचे खड्डेमुक्त नागपूर अभियान जोरात

नागपुर :- नागपूर सिटिझन्स फोरमने खड्डेमुक्त नागपूर हे अभियान सुरु केले आहे. आपापल्या क्षेत्रातील खराब रस्ते व खड्ड्यांचे फोटो पाठवा असे आवाहन फोरमतर्फे नागपूरकरांना करण्यात आले आहे. सोशल मिडीयावरील या आंदोलनाला नागपुरकरांनी भरघोस प्रतिसाद देत आजपर्यंत 1500 च्या जवळपास खड्ड्यांचे फोटो नागपूर सिटिझन्स फोरमकडे पाठविले आहे. यासंदर्भात नागपूर लाईव सिटी अँप व इतर माध्यमातून नागपूर महानगरपालिकेला तक्रारी दिल्या तरीही फारसे खड्डे बुजविण्यात आले नाहीत. याच अभियानाचा एक भाग म्हणून नागपूरकरांनी खड्ड्यांभोवती दिवे लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

पश्चिम नागपुरातील झिंगाबाई टाकळी, पूर्व नागपुरातील कळमना व वाठोडा, पश्चिम नागपुरातील हजारीपहाड व सुरेंद्रगढ तर दक्षिण पश्चिम नागपुरातील नरेंद्रनगर व खामला परिसरात प्रतिकात्मक स्वरुपात हे आंदोलन करण्यात आले.

वाठोडा डम्पिंग यार्ड परिसरातील रस्ता अत्यंत दयनीय स्थितीत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक असल्याने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार अर्ज विनंत्या करुनही खड्डे बुजविले जात नसल्याने आता गांधीगिरीचा मार्ग अवलंबण्यात आला. येथील युवकांनी खड्ड्यांभोवती मेणबत्या व फुलझड्या लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कळमना पेट्रोल पंप परिसरातील नागरीकांनीही रस्त्यांवर दिवे लावून रोष व्यक्त केला.

झिंगाबाई टाकळी परिसरातील मेन रोड व गावंडे लेआउट व गोधनी रोड परिसरातील नागरीकांनी खड्ड्यांभोवती पणत्या लावत महानगरपालिकेचा निषेध केला. वारंवार तक्रारी करुनही महापालिका रस्ते दुरुस्ती संदर्भात कुठलेही पाऊल उचलत नसल्याबद्दल नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी जमा झाल्याने वाहने घरापर्यंत नेण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे स्थानिक नागरीकांचे म्हणणे आहे. मोठमोठ्या खड्यांमुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी सांगितले. मनपा अधिकारी व स्थानिक जनप्रतिनिधी या बाबत उदासीन असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला.

नरेंद्र नगर परिसरातील हाॅटेल रेडिसन ब्लू परिसर व लंडन स्ट्रीट परिसरातील खड्ड्यांसमोर स्थानिक युवकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. पश्चिम नागपुरातील हजारीपहाड व सुरेंद्रगढ परिसरातील नागरीकांनीही खड्ड्यांभोवती मेणबत्या लावून या अभियानात सहभाग नोंदविला. या अभियानात अमित बांदूरकर, अभिजित झा, विकास चेडगे, वैभव शिंदे पाटील, अभिजित सिंह चंदेल, प्रतिक बैरागी, गजेंद्र सिंह लोहिया, निक्कू हिंदुस्थानी, श्रिया ठाकरे, शशांक गट्टेवार व श्री पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे उपस्थित होते.

28 ऑक्टोबरपासून नागपूर सिटिझन्स फोरमने खड्डेमुक्त नागपूर हे अभियान सुरु केले आहे. सोशल मिडीयावर खड्ड्यांचे फोटो वायरल झाल्यानंतर नागपूर महानगरपालिकेने खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली मात्र संथ कारभारामुळे शहरातील खड्ड्यांची समस्या सुटण्यास अजून बराच कालावधी लागेल असे नागपूर सिटिझन्स फोरमने म्हटले आहे. नागपूर मनपा आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांचे व खराब रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करुन युद्ध पातळीवर खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घ्यावी अशी मागणी फोरमने केली आहे.

येत्या 15 दिवसांच्या अवधीत या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलले नाही तर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरु करण्याचा इशारा फोरमने दिला आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यात शहरातील खड्ड्यांना लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांची नावे देऊन नामकरण करणे व मनपा मुख्यालयाबाहेर खड्ड्यांच्या फ्लेक्सचे प्रदर्शन भरविण्यात येईल.

शहरातील नागरी समस्यांबद्दल प्रशासनाला जागे करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या माध्यमातून जी जनजागृती होत आहे त्यामुळे नागरीकांना त्यांचे हक्क व अधिकार याची जाणीव होत आहे. या माध्यमातून प्रशासनावर नागरीकांचा वचक निर्माण होत आहे

– अमित बांदूरकर, नागपूर सिटिझन्स फोरम

महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नाबद्दल संवेदनशीलता दाखवावी. नागपूर लाईव सिटी अॅपवर खड्ड्यांबाबत येणार्‍या तक्रारी खड्डे न बुजवता बंद करु नये. सिमेंट रस्त्यांऐवजी खराब रस्ते सुधारण्याला प्राधान्य दिले तर शहर सुंदर होईल

– अभिजित झा, नागपूर सिटिझन्स फोरम

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved